Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरसेवक स्टिकर लाऊन अमली पदार्थांची तस्करी

औरंगाबाद वृत्तसंस्था । मुंबईहून शहरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून पंचवटी चौकात एका चारचाकी वाहनाला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात अंमली पदार्थांचा साठा सापडला. त्यात चरस आणि एमडी होतं. ते जप्त करण्यात आले असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.

पंचवटी चौकात मंगळवारी, २९ सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्तांच्या दालनाचे पोलीस अधिकारी रोडे आणि भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी वाहनामधून दोन जणांना ताब्यात घेतले. आशिक अली मुसा कुरेशी (४१, रा. कुर्ला) आणि नौरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद (४०, रा. भारतनगर, वांद्रे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. वेदांतनगर पोलिसांसोबत विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाहन तपासणी करण्यात आली. या वाहनातून चरस आणि मेफोड्रेन जप्त करण्यात आले. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी जप्त केलेल्या वाहनावर महापालिका नगरसेवक असा स्टिकर लावण्यात आला आहे. अंमली पदार्थांसह अटक केलेल्या दोघांची चौकशी पोलिसांनी केली असता कन्नडकडे जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये एमडीची किंमत मुंबईत ४ ते ५ हजार रूपये प्रति ग्रॅम आहे. औरंगाबादेत या एमडीची किंमत आठ हजार रूपयांहून अधिक आहे.

Exit mobile version