Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू : खबऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकरी

 

गडचिरोली : वृत्तसंस्था ।  जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या खबऱ्यांच्या  कुटुंबातील एका व्यक्तीस पात्रतेनुसार वर्ग-३ व वर्ग-४  पदावर अटींच्या अधीन राहुन शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.

 

नक्षलवाद्यांकडून मारल्या गेलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबापैकी पात्र असणाऱ्या एका व्यक्तीसाठी पोलीस अधीक्षक हे प्रमाणपत्र देण्यास सक्षम आहेत.

 

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयास एकूण १८० प्रस्ताव प्राप्त झालेले असून, प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ज्येष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक तसेच आवश्यक पात्रतेनुसार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून रिक्त असलेल्या पदांची तातडीने माहिती घेतली. त्यातील रिक्त पदावर नियुक्ती करण्याकरीता सन २०१८ पासून ते आजतागायत वर्ग-३ करिता आदिवासी विकास महामंडळ  नाशिक यांच्याकडे ३८ उमेदवार, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे ८ उमेदवार, गडचिरोली जिल्हा अधीक्षक यांच्याकडे ४ उमेदवार, गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे ८९ उमेदवार, गडचिरोली परिवहन महामंडळ यांच्याकडे १ उमेदवार, जिल्हा हिवताप कार्यालय यांच्याकडे २ उमेदवार, गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे ४ उमेदवार, गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे १ उमेदवार, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २ उमेदवार व महसूल विभागात ३ उमेदवार असे एकूण १५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

 

.आदिवासी विकास महामंडळाकडून ८, महसूल विभाग-३, वनविभाग ८, पुरवठा विभाग ४, कृषी विभाग १, व जिल्हा हिवताप कार्यालय १ अशा एकूण २५ उमेदवारांची संबंधित विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित उमेदवारांना नियुक्ती करण्याबाबतची संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही सुरु आहे. सद्यास्थितीत जिल्हा प्रशासनाकडे शिफारस करीता शिल्लक असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या दृष्टीनं विविध कार्यालयांकडून रिक्त पदांची माहिती घेण्यात येत असून, नक्षलपीडित उमेदवारांना तातडीने लाभ देण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत, असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितलं.

Exit mobile version