Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नक्षलवादी होण्याची परवानगी द्या ; विमनस्क शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय.

 

सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय.

 

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पतंगे यांनी एक शेतकरी म्हणून आपली व्यथा मांडली आहे. माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय?, असा प्रश्न या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचप्रमाणे पत्रामध्ये मांडण्यात आलेली कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची असल्याचे पतंगे यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.

 

तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या, असं या पत्रात पतंगे यांनी म्हटलं आहे. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तुम्ही सांगितलेलं की पाच एकरासाठी २० हजार रुपये देऊत पण प्रशासनाने आमच्या हाती नऊ, पाच हजार देऊन आमची बोळवण केली. महावितरणचे अधिकारी वीज कापण्यासाठी येत आहेत. आता गुरांना पाणी देण्याचा प्रश्नही निर्माण झालाय. प्रशासनाने अशी भयान परिस्थिती करुन ठेवली आहे की आता नक्षलवादी होण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही, असं पतंगे यांनी  सांगितलं. पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्यांनी स्वत:ची ओळख ‘तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी’ अशी करुन दिलीय.

Exit mobile version