Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नक्षलवादी हल्ल्याच्या ठिकाणी अमित शाह जाणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  । संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले  या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे घटनास्थळाला भेट देणार आहे.

 

सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह करणार आहेत.

 

रविवारच्या हल्ल्यानंतर शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून या हल्ल्याची माहिती घेतली. त्यांनी सीआरपीएफचे संचालक कुलदीप सिंह यांना तातडीने छत्तीसगडला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.   आता शाह यांनीच घटास्थळी जाऊन पहाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमित शाह हे या ठिकाणाला आज भेट देतील आणि त्यानंतर शाह हे जखमी जवानांचीही भेट घेणार आहेत.

 

चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या आठ, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या सात, स्पेशल टास्क फोर्सच्या सहा आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला,  असेही त्यांनी सांगितले. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी सापडले होते.

 

तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.  चकमकीच्या ठिकाणी रस्ते, पायवाटा आणि शेतांमध्ये गोळ्यांनी चाळण झालेले जवानांचे मृतदेह आढळले. मृतदेहांवर गोळ्यांबरोबरच धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणाही आढळल्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

 

नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात २ एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा पाच ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती.  पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन १चा म्होरक्या हिदमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

Exit mobile version