Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नऊ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागिर फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोन्याचे दागिने घडविण्यासाठी डाय तयार करून घेऊन ये असे सांगून बंगाली कारागिराकडे दिलेली ९ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड घेऊन तो १० नोव्हेंबर रोजीपासून पसार झालेला आहे. सव्वा दोन महिने झाले तरी सोने परत मिळत नसल्याने अखेर शुक्रवार १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात बंगाली कारागीर विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील सुवर्ण व्यवसाय मोठा असून येथे पश्चिम बंगालमधील हस्तकागिरीर कामाला आहे. या कारागिरांकडे सोने देऊन त्यांच्याकडून दागिने घडवून घेतले जातात. अशाच प्रकारे बदाम गल्लीत सुभाशीष पंचानंद धारा (वय-३३) यांचे दागिने घडणावळीचे दुकान असून त्यांच्याकडे शहरातील नामांकीत सुवर्णपेढीकडून दागिने घडवण्यासाठी ९ लाख रूपये किंमतीची सोन्याची लगड देण्यात आली. ती लगड धारा यांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या रतन तारापदा मांझी (रा. चोकचायपाट, जि. मिदिनापूर, पश्चिम बंगाल) याच्याकडे १० नोव्हेंबर रोजी दिली व एका दुकानावर डाय पाडून आणण्याचे सांगितले. त्यासाठी त्याला सुभाशीष धारा यांनी त्यांच्या शालकासोबत दुचाकीवर पाठविले. शालक एका ठिकाणी पार्सल देण्यासाठी गेला असताना रतन मांझी हा दिलेले सोने घेऊन पसार झाला. त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने पश्चिम बंगालमध्ये त्याच्या आई-वडिलांना ही माहिती देण्यात आली. त्या वेळी त्यांनी मुलाला सोने परत देण्याचे सांगतो, अशी विनंती केली. अखेर ९ डिसेंबर रोजी रतन मांझी जळगावात आला व त्याने थोडा वेळ मिळण्याची मागणी केली. मात्र बरेच दिवस झाले तरी सोने परत मिळत नसल्याने धारा यांनी शुक्रवार, १९ जानेवारी रात्री १० वाजता शनीपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करत आहेत.

Exit mobile version