Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळे ठरले राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर

 

धुळे : वृत्तसंस्था । धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे.

 

गेल्या दोन महिन्यांत धुळे  शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत . त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

 

शहरात 25 जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर 3 ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही. गेल्या दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. यापूर्वी 8 जून रोजी 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने मृत्यू झालेला शहरातील तो शेवटचा रुग्ण होता. 31 डिसेंबर 2020 ला शहरात सर्वाधिक 111 रुग्ण बाधित होते. यानंतर ही संख्या कमी झाली. 5 फेब्रुवारी 2021 रोजी शहरातील बाधितांची संख्या 53 होऊन हा आकडा वाढत होता.

 

25 जुलै रोजी ही संख्या शेवटच्या एका रुग्णावर येऊन थांबली. नियमांची अंमलबजावणी लसीकरण आणि प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळेच धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. मात्र शहर जरी कोरोनामुक्त ठरलं असेल तरी कोरोनाचा धोका टळलेल्या नाही, त्यामुळे याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील मनपा आयुक्त अजिज शेख यांनी केले.

 

जिल्ह्यातील साक्री तालुकावगळता शिरपूर, शिंदखेडा आणि ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असल्याने धुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे कोरोनाचे जिल्हा समन्वयक डॉ. विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

 

लसीकरण, कडक निर्बंध, शारीरिक अंतर, मास्कचा वापर केल्याने कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  डेल्टा प्लस विषाणू आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील अधिकऱ्यांनी केले.

 

Exit mobile version