Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धान्य उचल मुदत संपुष्टात ; मार्चचे धान्य वितरण रखडले

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या जानेवारीपासून स्वस्त धान्य वितरणात घोळ सुरु असून अनेक लाभार्थ्यांना फेब्रुवारीचे-मार्च चे देखील धान्य मिळालेले नाही. जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणाची वाहने वेळेवर जाताना दिसत असली तरी रेशन दुकानदारमात्र रेशन पुरवठा आलाच नसल्याचे सांगत लाभार्थ्यांना आल्या पावली  परत पाठवत असल्याचे चित्र आहे.  तर दुसरीकडे महसूल विभाग कर्मचाऱ्यांचा संप असल्याने पुरवठा विभागाचे देखील दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यासह गेल्या तीन ते चार महिन्यापासून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य लाभ अनियमितरित्या मिळत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉज मशीनमध्ये डाटा फीड नसल्याने तसेच ई-पॉज ऐवजी थेट लाभार्थ्याना धान्य लाभ देण्यात येऊ नयेत असे आदेशही शासन निर्देशानुसार पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले असल्याने देखील शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य लाभ मिळालेला नाही.

बऱ्याच शिधापत्रिका धारकांना जानेवारीचे धान्य मार्च मध्ये तर मार्चचे धान्य १० एप्रिल होऊनही मिळालेले नाही. बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांकडून पात्र शिधापत्रिका धारकांना मोफतचे धान्य न देता देय रकम घेऊन अपूर्ण धान्य लाभ दिला जात असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात एफसीआय कर्मचाऱ्यांचा संपामुळे धान्य उचल करण्यात अनेक अडचणी आल्यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य लाभ मिळू शकला नाही.

मुदतवाढ प्रस्ताव शासनस्तरावर रवाना 
गेल्या तीन महिन्यापूर्वी एफसीआयच्या कामगारांचा संप असल्याने धान्य उचल करण्यात विलंब झाला होता. फेब्रुवारीच्या धान्याची उचल करण्यात आली असून बहुतांश ठिकाणी वितरण पूर्ण करण्यात आले असून मार्च महिन्यातील धान्य ग्रामीण भागात वितरीत करण्यात आले आहे. मात्र शहरी भागातील मार्च महिन्याची धान्य उचल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने तालुकास्तरावर धान्य वितरण झालेले नाही. मार्चचे धान्य उचल करण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आला आहे.
सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

Exit mobile version