धरतीचा स्वर्ग करण्याची प्रेरणा देणारा अंटार्टिका खंड : डॉ. चिंचाळकर

जळगाव प्रतिनिधी । धरतीचा स्वर्ग करण्याची प्रेरणा देणारा अंटार्टिका खंड असून जीवनाची आगळीवेगळी अनुभूती घेण्याची संधी मला प्राप्त झाली. एक वर्षाच्या वास्तव्यात मला निसर्गाचे महत्व आणि मानवाच्या हव्यासाने होत असलेल्या निसर्गाच्या विनाशाबद्दल जाणीव झाली असे प्रतिपादन पोलर वुमन डॉ. मधुबाला जोशी- चिंचाळकर यांनी केले.

रोटरी क्लब जळगाव वेस्ट व आशा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गप्पा इंडियाशी या उपक्रमाचे पाचवे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरीचे कृष्णकुमार वाणी, सचिव सुनील सुखवानी, साक्षरता कमिटी चेअरमन प्रशांत महाशब्दे, कार्यकारी संचालक गिरीश कुळकर्णी, डॉ. भगवतीप्रसाद चिंचाळकर आदी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात त्यांनी अंटार्टिका मोहिमेतील अनेक थरारक अनुभव सांगत श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. सुमारे चार महिने उन्हाळा व आठ महिने हिवाळा असलेल्या या खंडात जीवन जगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत भारतीय शास्त्रज्ञ ज्या पद्धतीने संशोधन करतात हि प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आहे. रात्रीचा सूर्य व पोलर रात्र आदी यासारख्या अभ्यासक्रमातील गोष्टी त्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे स्पष्ट केले. अनेक विपरीत प्रसंगांना सामोरे जात असतांना आलेल्या अडचणीवर त्यांनी केलेली मात जीवन जगण्याची प्रेरणा देणारे होते.

भारत सरकारच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या भारती व मैत्री या अंटार्टीकेतील संशोधन केंदारांबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधीही त्यांनी सांगितल्या. अंटार्टिका हे नाव कसे पडले यापासून तर हा खंड कसा निर्माण झाला याचा इतिहासही त्यांनी सांगितलं. मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याने निसर्गाचे लेणे लाभलेला हा खंड आपली ओळख कायम ठेवून आहे. प्रत्येक माणसाने नैसर्गिक जीवनशैली स्वीकारत पृथ्वी या ग्रहाचा स्वर्ग केला पाहिजे असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी मने जिंकली. गिरीश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक तर सुनील सुखवानी यांनी आभार प्रदर्शन केले. मान्यवरांचा परिचय सुजाता बोरकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत महाशब्दे यांनी केले.

Protected Content