Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; नगराध्यक्षांनी केली कोवीड रॅपिड टेस्ट किटची मागणी

धरणगाव (प्रतिनिधी)। धरणगावच्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत कोरोना रॅपिड टेस्ट किटची अत्यंत गरज असून त्या तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

आज धरणगाव येथील कोविड -१९ केअर सेंटरला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देत परिस्थिती जाणून घेत सर्व सुविधांच्या आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सर्व रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच सुविधांचा आढावा घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या सोबत चर्चा करून पुढील नियोजन संबंधी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, धरणगाव शहरासाठी काही रॅपिड टेस्ट कीड उपलब्ध झाल्या होत्या. त्या किटसचा आम्हाला चांगला उपयोग झाला. पर्यायी विलगीकरण असलेल्या संशयित रुग्णांवराचा खर्चदेखील कमी झाला. त्यामुळे धरणगाव शहरात जास्तीत जास्त रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा व्हावा, जेणेकरून रुग्णांचे अहवाल तात्काळ मिळतील आणि आम्हाला सेवा देताना अडचणी येणार नाहीत. त्यावर जिल्हा अधिकारी श्री.राऊत यांनी संमती दर्शविली आणि आपण एक अहवाल वजा मागणी पत्र पाठवा, आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरविण्यात येतील, असे आश्वासन दिले. नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि जिल्हाधिकारी श्री राऊत यांच्यात साधारण अर्धा ते एक तास सेंटरच्या पाहणीदरम्यान सविस्तर चर्चा झाली.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, तालुका आरोग्य अधिकारी श्री सोनवणे, तालुका शल्यचिकित्सक डॉ.गिरीश चौधरी, पोलीस निरीक्षक पवन देसले आदि उपस्थित होते.

Exit mobile version