Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात पालकमंत्र्यांनी घेतला आढावा ; ग्रामीण रुग्णालयात दिवसभर ओपीडी सुरु ठेवण्याचे आदेश

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील लहान माळीवाडा,नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दिवसभर ओपीडी सुरु ठेवण्याचे आदेश देत आवश्यक असणारे पीपीई कीटसह सर्व वैद्यकीय साहित्य ग्रामीण रुग्णालयास तात्काळ उपलब्ध करून दिले. दरम्यान, शहरात पाच दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली आहे.

 

शहरातील लहान माळीवाडा,नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती शनिवारी रात्री उशिरा समोर आली होती. आज सकाळी या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमिवर धरणगाव नगर पालिकेत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ना. पाटील यांनी  जिल्हा आरोग्य यंत्रणेला  धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी अतिरिक्त एक डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. ना. पाटील यांनी धरणगाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांचीही चांगलीच कानउघाडणी केली. तसेच दिवसभर ओपीडी सुरु ठेवण्याचे आदेश देखील दिलेत.

 

आरोग्य विभागाची कानउघाडणी 

 

कोरोनाग्रस्त महिलेच्या बाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने धरणगाव प्रशासनाशी आधीच संपर्क साधायला हवा होता. परंतू त्यांनी संपर्क न साधल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याची  देखील कानउघाडणी केली. वेळीच माहिती मिळाली असती तर, संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना आधीच विलगीकरण कक्षात ठेवता आले असते आणि त्यामुळे संभाव्य धोका कमी झाला असता, असेही ना.पाटील म्हणाले. यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा स्वॅब घेतला तर स्थानिक प्रशासनाला कळविण्याचे सक्त आदेश दिलेत.

 

पाच दिवस लॉकडाऊन पाळा : ना. पाटील

धरणगावात काल कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ आढावा बैठक घेऊन शहरात पाच दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली. धरणगावकरांनी घरात बसून हा लॉकडाऊन यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. या आवाहनाला व्यापारी संघटनेने देखील तात्काळ प्रतिसाद देत पाच दिवस लॉकडाऊन पाळण्याचे आश्वासन दिले.

 

यांची होती उपस्थिती 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष निलेश चौधरी,गटनेते पप्पू भावे, चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, माजी प्र. नगराध्यक्ष वासुदेव चौधरी,  पं.स.चे माजी सभापती दीपक सोनवणे, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, मोती अप्पा पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश चौधरी, विजय महाजन, विलास महाजन यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version