Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीर उत्साहात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  विद्यार्थी व युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. त्या क्षेत्राचे कौशल्य प्राप्त करुन आपला विकास साधावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागमार्फत शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगांव यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय अॅण्ड लॉन्स, धरणगाव येथे इयत्ता दहावी, बारावी पास विद्यार्थी व बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होणेसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगावचे प्राचार्य आदि उपस्थित होते.

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले  की, राज्य शासन युवक व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करुन देत आहेत. विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून कौशल्य प्राप्त केले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात जिद्द आणि चिकाटी ठेवून काम केल्यास यश निश्चित मिळते. असे सांगून या शिबिरांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे युवकांना उद्योजक बनण्याची संधी आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावे. छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराच्या माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

या शिबीरात युवक व पालकांना विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ञ व नामांकित व्यक्तींनी विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. सुरुवातीस कौशल्य विकास विभागामार्फत लावलेल्या प्रदर्शनाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. शिबिरास तालुक्यातील युवक, विद्यार्थी, पालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version