धरणगावला पेयजल वितरणासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव- ना. गुलाबराव पाटील

धरणगाव । धरणगावातील नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजूरी मिळणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

धरणगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्यासह १०.२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आज ग्रामविकास राज्यमंत्री ना. दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी आमदार आर. ओ. पाटील, कैलास पाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. सपना वसावा, संजय सावत, चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, सौ. महानंदाताई पाटील, ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया आदि मान्यवर उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व गावे पक्या रस्त्यांनी जोडण्यात येत आहे. मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय पेयजल योजनेतून तालुक्यातील विविध गावांमध्ये २० ते ३० कोटी रुपयांचे कामे सुरु आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मालाला बाजारभाव मिळावा, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी तालुक्यात सुतगिरणीस मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सुतगिरणीमुळे तालुकयातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. धरणगाव शहरातील बाजारपेठेच्या रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्याचे नियोजन असून शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलतांना ग्रामविकास राज्यमंत्री ना. भुसे म्हणाले की, राज्य शासनामार्फत समाजातील वंचित, दुर्बल घटकातील नागरीकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन २०११ पूर्वीपासून शासनाच्या जागेवर अथवा गावठाण जागेवर राहणार्‍या नागरीकांची घरे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाची जळगाव जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर जळगाव ग्रामीण मतदार संघात विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी ग्रामविकास विभागामार्फत देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी धरणगाव नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतूक केले तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करावा तसेच मतदान यंत्राबाबत पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. आमदार किशोर पाटील यांनी विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी वाळू उपलब्ध होणे आवश्यक आहे. यावेळी माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनीही नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या कामांचे कौतूक केले. प्रास्ताविक गुलाब वाघ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शहराच्या विकासात योगदान देणार्‍या माजी नगराध्यक्षांचाही नगरपरिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, तहसीलदार श्री. राजपूत, प्रभारी नगराध्यक्ष प्रविण चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी. एम. पाटील, राजेंद्र महाजन, गजानन पाटील, यांचेसह धरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, विविध गावांचे सरपंच,उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

* महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्प- रुपये ४.७७ कोटी.

* वैशिष्टपूर्ण योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व जुनी प्रशासकीय इमारत नुतनीकरण रुपये २.८३ कोटी.

* वैशिष्टपुर्ण योजनेतंर्गत नवीन ९ लक्ष लीटर क्षमतेचे जलकुंभाचे बांधकाम करणे- रुपये ६२ लाख.

* वैशिष्टपुर्ण योजनेतंर्गत मार्केट कमिटी स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण करणे- रुपये १.९० कोटी.

* वैशिष्टयेपूर्ण योजनेतंर्गत सोनवद रोड स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण करणे – रुपये ९५ लक्ष.

Add Comment

Protected Content