Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धमकीमागचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा : अजित पवार यांची मागणी

मुंबई-‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘पवार साहेबांना सोशल मिडियावर देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मिडियावर देण्यात आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की,  पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रतील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता  सावध  आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

 

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, असा विश्वासही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला आहे.

Exit mobile version