Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

जळगाव, प्रतिनिधी | धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीच्या इंग्रजी माध्यमाच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यानुसार दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजेनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 

धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दगडाबाई चंपालालजी बियाणी संचलित बियाणी पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) भुसावळ, जि. जळगाव या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. प्रवेशासाठी अटी व शर्ती अशा : इच्छुक विद्यार्थी धनगर समाजाचा (भटक्या जमाती –क) असावा, विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेला धनगर समाजाच्या (भटक्या जमाती –क) दाखल्याची साक्षांकित प्रत व मूळ प्रत तपासण्यासाठी सादर करावी. विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल, तर त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपये राहील. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर २०२१ रोजी सहा वर्षे पूर्ण असावे, दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. निवासी शाळेत राहणाऱ्या विदयार्थ्याना वर्षातून दोनदा पालकांना भेटण्याकरीता प्रवास खर्च देण्यात येईल. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करण्यात येईल.
प्रवेश अर्जासाठी बियाणी पब्लिक स्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ, जामनेर रोड, भुसावळ, जि. जळगाव येथे सुनील पीहुल (९७६४०६१०१४) यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकीत प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेऊन सदरील अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावेत.

Exit mobile version