Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनंजय मुंडेंबद्दल पक्षप्रमुख म्हणून सहकाऱ्यांशी बोलून निर्णय होईल

मुंबई : वृत्तसंस्था । धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं शरद पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

“त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकली जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणाले की, “राजकारण होतंय का यावर मी जास्त भाष्य करणार नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य वाचलं. त्यांनी यामध्ये संयमाने जाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पक्षप्रमुखांचं हे मत असेल आणि इतरांचं दुसरं असेल तर अशा परिस्थितीचा फायदा विरोधकांकडून केला जात आहे याबद्दल अधिक सांगायची गरज नाही”.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीये का? असं विचारण्यात आलं असता शरद पवारांनी सांगितलं की, “मला आधी माझा निर्णय तर घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्री वैगेरे बघू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील भूमिका काय असेल त्यासंबंधी निर्णय़ घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याची कारण नाही. पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल”.

“नवाब मलिक महत्वाचे मंत्री आहेत. व्यक्तीगत त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही. त्यांच्या नातेवाईकावरआरोप झाला आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणं आणि वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संबंधितांकडून सहकार्य होईल याची खात्री आहे. गेली अनेक वर्ष नवाब मलिक राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच आरोप झालेला नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version