Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी पिटविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील बसस्थानकजवळ मंगळवारी ९ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रिक्षा चालकासह तीन महिला जखमी झाल्याने गावातील संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या नजीक असलेल्या गिरणा नदीतून बेसुमार अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरी वाहतूक केली जात आहे. वाळू वाहतूकदारांवर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचा प्रत्यय आजच्या घटनेतून दिसून आला आहे. मंगळवारी ९ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहूल बारेला रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता.जि.जळगाव याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून गावातील बसस्थानक परिसरातून जात होते. यावेळी पुढे जात असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जळगाव शहरातून आव्हाणे गावात येत असलेली प्रवाशी रिक्षा (एम.एच.१९,१४१३) हिला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालकासह तीन प्रवासी महिला गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांना जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार झाले. अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version