Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोषींवर कारवाईच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित आदिवासी तरूणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारा दरम्यान ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. या तरुणाचा मृत्यू हा हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करत  दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी मृत तरुणाचे नातेवाईक व लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दीड तासनंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वसन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

 

चोपडा येथील आदिवासी तरुण प्रदीप पावरा याला  दि. २९ मार्च रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यास लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्यास चोपडा येथे हलवण्यात आले. तेथे रुग्णाचा अहवाल व रुग्णवाहिका न दिल्याने दुचाकीवर बसवून २२ कि.मी.ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी त्याची ऑक्सीजन पातळी ७९ होती. तरीही त्याचावर  प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णाला मधुमेह असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. जळगाव येथे खासगी रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले. यानंतर ३० मार्च रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील हलगर्जीपणामुळे प्रदीप  यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. वॉर्डबॉय त्रास देत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार निकाली काढण्यात आली. त्यामुळे आज बुधवार १३ ऑक्टोबर रोजी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे,सचिन धांडे,अजय पावरा यांच्यासह आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून करण्यात येत आहे. मंगळवारपर्यंत याचा अहवाल सादर केला जाणार आहे.  यासंदर्भात प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. या चर्चेअंती  जिल्हाधिकारी यांनी दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भाग १

भाग २

 

Exit mobile version