दोन महिन्याचे बाळ दगावल्याने नातेवाईकांचा संताप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्याचा बालक उपचारादरम्यान दगावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. परिचारिका कक्षाची तोडफोड करून औषधांचे रॅक फेकून नुकसान केल्याची घटना मंगळवारी २३ मे रेाजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.  तसेच रुग्णालयीन कागदपत्रांची कार्यवाही न करता मयत बालकाला घेऊन पसार झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनातर्फे तक्रार देण्यात आली आहे.

 

चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेले विजय कोळी यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला सोनल हिस सोमवार २२ मे रोजी संध्याकाळी प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल केले होते. दरम्यान रुग्णाची प्रकृती खूप गंभीर होती. रुग्णाला न्युमोनिया आणि झटके येत होते. याबाबतची कल्पना बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णाला १४ नंबर आयसीयू विभागात भरतीदेखील केले.  रुग्णाला व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले. मंगळवार २३ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बालकाचा मृत्यू झाला.

 

याबाबत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कळविले. मात्र बालकाचा मृत्यू झाल्याबद्दल समजूतदारपणाची भूमिका न घेता नातेवाईकांनीच डॉक्टरांवर व परिचारिकांवर संताप व्यक्त केला.  शिविगाळ  करून त्यांनी औषधे ठेवलेला रॅक जोरात फेकून दिला.  त्यामुळे औषधींचे नुकसान झाले. तसेच बाहेर जात असताना परिचारिका कक्षाजवळ जात त्यांनी कक्षाचा काच फोडला. त्यामुळे कक्षामध्ये काचांचा खच पडला. परिचारिका व डॉक्टर समजावीत असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याच वेळेला रुग्णाच्या महिला नातेवाईकांनी मयत बाळाला घेऊन बाहेर पोबारा केला.  याबाबत वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Protected Content