Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णीत दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ; बाधितांचा आकडा पोहचला तीनवर

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथे परवा एकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शेंदूर्णी येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील ३ महिन्यांपासून शेंदुर्णी येथील नागरिकांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला केला होता व कोरोना संसर्ग रोखला होता. परंतु, मागील दोन दिवसात येथील ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जनतेने सतर्क होणे गरजेचे झाले आहे. येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी व त्यांच्या पत्नीचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता पर्यंत शेंदूर्णीत कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ३ वर पोहचली आहे. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती पती पत्नी असून वयस्कर असल्याने त्यांना इतरही व्याधी आहेत. गेल्या ८/९ दिवसापासून त्यांच्यावर औरंगाबाद येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मागील ३ दिवसांपासून कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिवारातील व इतर संपर्कातील व्यक्तींच्या नावांचा शोध घेतला जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती राहत असलेला परिसर शेंदूर्णी नगरपंचायतकडून सॅनिटाइज करून सील करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी व विना मास्क ,विना कारण घराबाहेर पडू नये. नगरपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष विजया खलसे,उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम ,सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी शेंदूर्णीकर जनतेला केले आहे.

Exit mobile version