Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात ५१, राज्यात २२ जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या ४५ हजार चाचण्यांमधून ५१ बाधितांची नोंद १२ राज्यांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी २२ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.

 

पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८,६९५ नवीन  बाधित आढळून आले आहेत. तर १,१८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी २१ जून रोजी ४२,६४० रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या २४ तासात ६४,८१८ रुग्ण घरी परतले आहे. त्यामुळे १७,३०३ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

देशात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ रुग्ण  बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात ३ लाख ९४ हजार ४९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण आहेत.

 

 

देशातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण १.३१ टक्के आहे,  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. देशात २ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगाच्या तिसऱ्या स्थानी आहे एकूण बाधितांच्या संख्येत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.

 

२५ जूनपर्यंत देशभरात ३१ कोटी ५० लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. शुक्रवारी ६१ लाख १९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत ४० कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १७ लाख नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

 

 

 

Exit mobile version