Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात ५० कोटी लोकांचे कोरोना लसीकरण

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कालपर्यंत देशात ५० कोटी भारतीयांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली  ट्विटरवरून त्यांनी  सर्वांसाठी मोफत लस या कार्यक्रमाचं कौतुक देखील केलं आहे.

 

देशभरात केंद्र सरकारकडून मोफत आणि व्यापक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आल्यापासून केंद्र सरकारकडूनच सर्व राज्यांमध्ये लसींचा पुरवठा केला जात आहे. या वर्षाखेरीपर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने जाहीर देखील केलं होतं.

 

५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “कोरोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

 

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दिवसभरात भारतात ४३ लाख २९ हजार डोस देण्यात आले आहेत. “भारतानं कोविड १९ साठीच्या लसीकरणात मोठी झेप घेतली आहे. आजपर्यंत भारताने ५० कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे”, असं ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. यामध्ये १७ कोटी २३ लाख २० हजार ३९४ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात १० कोटी नागरिकांना लस देण्यासाठी ८५ दिवस लागले. त्यानंतर पुढचे १० कोटी डोस देण्यासाठी ४५ दिवस लागले. ३० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी भारताला अजून २९ दिवस लागले. त्यापुढचे १० कोटी डोस देण्यासाठी २४ दिवस तर ५० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी त्यापुढे अवघे २० दिवस लागले.

 

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १ कोटींहून जास्त नागरिकांना लस दिली आहे. तर, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १० लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि नाशिकमधील भाजपाच्या खासदार भारती पवार यांनी या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “भारतात लसीकरणाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला ही अभिमानाची बाब आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे”, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.

 

Exit mobile version