Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । रुग्णसंख्येचा १६ सप्टेंबर २०२० रोजीच्या सर्वाधिक रुग्णसंख्येचा  विक्रम सोमवारी समोर  आलेल्या आकडेवारीने मोडीत काढला असून, गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

 

देशातील कोरोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येनं  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली होती. .

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.५२ हजार ८४७ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

 

 

पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती.  दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे.

 

देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे बाधित आढळून आले आहेत. राज्यात ५७ हजार ७४ नवीन बाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

Exit mobile version