Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशद्रोहाच्या आरोपाखाली तेलंगणातील आयपीएस अधिकारी निलंबित

ips a b rao

अमरावती, वृत्तसंस्था | देशद्रोहाच्या आरोपाखाली एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका इस्राइली कंपनीसाठी गुप्तहेरगिरी केल्याचा आरोप या आयपीएस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस महासंचालकपदाच्या रॅंकवर कार्यरत असणाऱ्या ए.बी. वेंकटेश्वर राव यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

 

आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिव नीलम सहानी यांनी डीजीपी गौतम सवांग यांच्या अहवालाच्या आधारे राव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याला सरकारच्या परवानगीशिवाय विजयवाडा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोपनीय अहवालानुसार, मागील सरकारच्या कार्यकाळात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर (गुप्तचर) काम करत असताना राव यांनी त्यांचा मुलगा आणि अकासम अॅडव्हान्स सिस्टम्स प्राइव्हेट लिमिटेडचे सीईओ चेतन साई कृष्णा यांना बेकायदेशीरपणे महत्त्वाच्या गुप्त आणि सुरक्षेशी संबंधित काम देण्यात आले होते. यामध्ये इस्राइलची संरक्षण क्षेत्रातील उपकरण उत्पादन करणारी कंपनी आर.टी. इंफ्लाटेबल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत हे काम एकत्रितपणे केले गेले.
या अहवालानुसार, आरोपी अधिकारी आणि परदेशी कंपनी यांच्यात उघडपणे संबंध असल्याचे दिसते. हा प्रकार नैतिक आचारसंहिता आणि अखिल भारतीय सेवा नियम, १९६८ चा नियम (३)(ए)चे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निलंबित अधिकारी राव यांच्या वर्तनामुळे राज्य, राष्ट्रविरोधी कृत्य झाले असून सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याजवळचे समजले जाणारे राव यांना वाय.एस. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागातून हटवण्यात आले होते.

Exit mobile version