Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांची टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाउनला विरोध केला ती त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका वेगळी असू शकते. मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन केला, तर फडणवीस म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाउन करा. अशा परिस्थितीत राजकारण करणं कुणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवावे लागतील,” अशी भूमिका शिवसेना नेते संजय  राऊत यांनी मांडली.

 

 

 

दररोज राज्यात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट होत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत असून, औषधांसह बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाउनचा विचार सुरू असून,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नकारार्थी सूर लावला आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधत फडणवीसांना टोला लगावला आहे.

 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवरून संवाद साधला. “देशात लॉकडाउनची गरज आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. लॉकडाउनची गरज असल्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत. जर केंद्राला वाटतंय की, लॉकडाउनची गरज आहे. तर पंतप्रधान मन की बात देशाला सांगतील. पण मला वाटतं पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. पण जास्तीत जास्त लसींचे डोस राज्यांना दिल्या गेल्या पाहिजे. लोकांच्या जीवांचं रक्षण करणाऱ्या लसींचा आणि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम वाटत असेल, तर ठिक आहे, पण संपूर्ण देश तुमचा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

 

यावेळी राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला. “प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही. त्यांनी महाराष्ट्रात यावं. त्यांनी मुंबईत बसावं, पुण्यात बसावं, इथली परिस्थिती बघावी  असेही ते म्हणाले .

Exit mobile version