Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दूध दरवाढीवर लवकर निर्णय झाला नाही, तर पुढचे आंदोलन मर्यादा ओलांडणारे असेल : राजू शेट्टी

कोल्हापूर (वृत्तसंस्था) आमच्या आया-बहिणी शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? बाटलीबंद पाण्याला २० रुपये आणि दुधाला १७ रुपये दर मिळतोय. मग आंदोलकांनी दूध ओतले तर त्याला नासाडी का म्हणायचे?. येत्या ८-१० दिवसांमध्ये दूध दरवाढीवर निर्णय झाला नाही, तर पुढचे आंदोलन मर्यादा ओलांडणारे असेल. पुढचे आंदोलन स्वाभिमानी स्टाईलने असेल, असाही इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूरमध्ये शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर २० रुपये मिळतात. मात्र, दुधाला १७-१८ रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. आमच्या आया-बहिणी राबराब राबतात. शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असणाऱ्या दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत मिळत आहे. मरण येणारच असेल, तर सोशल डिस्टन्स कशाला? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, येत्या ८-१० दिवसांमध्ये दूध दरवाढीवर निर्णय झाला नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

Exit mobile version