Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुसऱ्या लाटेत ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दुसऱ्या लाटेनं तब्बल १ कोटी नोकऱ्यांचा घास घेतला. देशातील ९७ टक्के कुटुंबांचं उत्पन्न  कमी झाल आहे.

 

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेनं देशातील १ लाख ७५ हजार कुटुंबांची पाहणी केली. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंही अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ्याच राज्यांनी कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादले. याचा परिणाम अर्थचक्रावर झाला

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी बेरोजगारीत झालेल्या वाढीबद्दल माहिती दिली.

पहिल्या लाटेत कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पहिल्या लाटेतून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यातही बेरोजगारी वाढली असल्याचं दिसून आलं आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे व्यास म्हणाले की, देशात दुसऱ्या लाटेमुळे १ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरी लाट हे मुख्य कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं. लॉकडाउनमधून अर्थव्यवस्था खुली होत असतानाच लाट आली. त्यामुळे बेरोजगारीची समस्या पूर्णपणे सुटली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२० मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता. दुसरी लाट आल्यानंतर अनेक राज्यांनी निर्बंध लादले, त्याचा परिणाम थेट अर्थचक्रावर झाला आहे.

 

ज्या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या त्यांना पुन्हा नोकरी मिळवण्यात अडचणी येत आहे. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती सुरू झाली. मात्र संघटित आणि चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यात साधारणतः वर्षभराचा कालावधी तरी लागतो, असं व्यास यांनी स्पष्ट केलं.

 

Exit mobile version