Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुसऱ्या लाटेत युरोपात आठवडाभरात ९ लाख कोरोनारुग्ण

जिनिव्हा : वृत्तसंस्था । दुसऱ्या लाटेत युरोपात आठवडाभरात ९ लाख २७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, युरोपातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गेल्या आठड्यात युरोपात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली असून, जगभरात एकूण नव्या रुग्णसंख्येत ३८ टक्के वाढ झाल्याचे यात म्हटले आहे. रशिया, चेक प्रजासत्ताक आणि इटली या देशांमध्ये युरोपातील नवीन रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आढळले आहेत. युरोपातील मृतांची संख्याही वाढत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत करोनामृत्यूंची संख्या एकतृतीयांश वाढली आहे. गेल्या आठवड्यात स्लोवानियामध्ये रुग्णसंख्येत ४,८९० इतकी वाढ झाली असून, ही वाढ १५० टक्के इतकी आहे.

युरोपीय देशांची काळजी आणखी एका कारणामुळे वाढली आहे. युरोपात दुसरी लाट आली असताना बाधितांमध्ये वृद्धांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. युरोपीयन सेंटर फॉर डिजीस प्रीव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने इशारा जारी केला आहे. जवळपास १३ युरोपीयन देशांमध्ये ६५ वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये संसर्ग फैलावत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये मागील सहा आठवड्यात ६५ व त्यावरील अधिक वयांच्या बाधितांची संख्या तीनपटीने वाढली आहे.

वृद्धांना बाधा झाल्यास आजारातून बरे होण्यासही वेळ लागतो. त्याचा भार रुग्णालयावर अधिक येत असल्याचे पहिल्या लाटेच्या वेळेस समोर आले. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे. कोव्हिड-१९च्या रुग्णांवर उपचार करताना मेलबर्नमध्ये फेरसंसर्ग झाल्याच्या केसेस दुर्मीळ प्रमाणात आढळल्याचे ऑस्ट्रेलियातील प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version