Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा मूलभूत अधिकार कुठल्याही धर्माला नाही – कर्नाटक उच्च न्यायालय

 

 

बंगळुरू : वृत्तसंस्था । कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

 

एखाद्या धर्माच्या प्रमुखांनी किंवा धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एचपी संदेश यांनी सांगितलं.

 

यावरुनच त्यांनी दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधातली अन्य धर्मांची बदनामी केल्याची फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला. इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला नाही. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की कोणत्याही धर्माची बाजू घेत असताना, त्या धर्मप्रमुखांनी किंवा धर्माबद्दल भाष्य करणाऱ्या व्यक्तींनी इतर धर्मांची बदनामी करु नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा खटला सुरु होता. या महिलेची तक्रा होती की, आरोपी महिलेल्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली. ह्या दोघांनीही भगवद् गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या महिलेने तक्रार दाखल केली होती.

 

 

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा या दोन आरोपींवर दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत आरोपपत्रही दाखल केलं आहे. आपल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याने हा खटला रद्द करावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू समजून घेत हा निकाल दिला आणि आरोपींची मागणी फेटाळून लावली आहे.

 

Exit mobile version