Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुग्ध व्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टर खरेदी !

 

ठाणे  : वृत्तसंस्था ।  भिवंडीतील एका शेतकऱ्याने आपल्या दुग्ध व्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलंय. मूळ शेतकरी असलेले जनार्दन भोईर हे एक बिल्डर देखील आहेत. अलिकडेच त्यांनी डेअरी व्यवसायात पाऊल ठेवलंय.

 

.

 

देशभरात आपला डेअरी व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने जनार्दन भोईर यांनी ३० कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर खरेदी केलं आहे. दुग्ध व्यवसायासाठी अनेकदा पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि गुजरातला जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी विमानतळांची सुविधा नसल्याने प्रवासात अनेक तास घालवावे लागायचे. नंतर मित्राच्या सांगण्यावरून हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे ठरवले, असे जनार्दन यांनी सांगितले.

 

 

हेलिकॉप्टरसाठी नक्की काय, कशी व्यवस्था आहे हे पाहण्यासाठी व ट्रायलसाठी रविवारी  मुंबईहून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन भिवंडीच्या वडपे गावात गेले होते. यावेळी जनार्दन यांनी स्वतःऐवजी गावातील पंचायतीच्या सदस्यांना हेलिकॉप्टरमधून फेरफटका मारण्याची संधी दिली.

 

 

अद्याप जनार्दन यांना हेलिकॉप्टर मिळालेलं नाही. १५ मार्च रोजी त्यांना हेलिकॉप्टर मिळणार आहे. जनार्दन आपल्या अडीच एकर जागेत हेलिकॉप्टरसाठी इतर व्यवस्था करत आहेत. या जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, एक पायलट रुम व टेक्निशिअनसाठी एक रुम असेल.

 

भिवंडीमध्ये बर्‍याच मोठ्या कंपन्यांचे गोदाम आहेत आणि त्यातून  गोदाम मालकांना चांगलं भाडं मिळतं. जनार्दन हे बर्‍याच गोदामांचे मालकही आहेत, त्यातूनही त्यांची रग्गड कमाई होते. शेती व दुग्ध व्यवसायाबरोबरच जनार्दन यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायही आहे.

Exit mobile version