Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं

 

 

परभणी : वृत्तसंस्था । अपघाताच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी ठरलेल्या १. ५ कोटी रुपयांपैकी १० लाख रुपये उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने घेताना आज एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली

 

परभणी जिल्ह्यातील सेलूत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह पोलीस शिपाई गणेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका व्यक्तीने तक्रार केली होती. अपघाताच्या गुन्ह्यातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी 2 कोटींची लाच मागितली होती. अखेर दीड कोटी रुपये देण्याचं ठरलं. संबंधित व्यक्तीने पद्धतशीरपणे सर्व प्रकार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगत तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करणाऱ्या व्यक्तीविरोधात 2 मे 2021 रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अपघाताप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या गुन्ह्यातील मृतकाच्या पत्नीसोबत तक्रारदाराचे मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावले.

 

‘आम्ही तुझे मृतकाच्या पत्नीसोबतचे मोबाईल फोनवरील संभाषण ऐकले. तुला या प्रकरणातून बाहेर पडायचे असल्यास दोन कोटी रुपये द्यावे लागतील’, असं राजेंद्र पाल तक्रारदारास म्हणाले. याशिवाय पाल यांनी तक्रारदारास वारंवार फोन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली.

 

तडजोडीनंतर अखेर हे प्रकरण मिटवण्यासाठी दीड कोटी रुपये लाच देण्याचं निश्चित झालं. पण तक्रारदारास प्रचंड त्रास झाला. त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत आपली तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारदारास विश्वासात घेऊन राजेंद्र पाल यांना रंगेहाथ पकडण्यासाठी जाळं आखलं. अखेर त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि त्याचा सहकारी पोलीस शिपाईदेखील रंगेहाथ पकडला गेला.

 

तक्रारदाराचा भाऊ दीड कोटी रुपयांपैकी दहा लाख रुपये देण्यासाठी गेला. यावेळी पोलीस शिपाई गणेश चव्हाण याने तक्रारदाराच्या भावाकडून पैसे घेतले. त्याने पैसे घेतल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याला ताब्यात घेतलं. लाचलुचपत विभागाने तक्रादाराच्या भावाकडून तडजोडीच्या दीड कोटींपैकी दहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी राजेंद्र पाल आणि गणेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Exit mobile version