Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिशा रवीला जामीन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । न्यायालयाने पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळून लावत दिशा रवीला जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे

शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. .

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्गने जी टूलकिट ट्विट केली होती. त्या टूलकिट संदर्भात दिशाला प्रमुख संयशित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिटमध्ये दिशाने बदल केले. त्यात काही मुद्दे टाकले आणि ती टूलकिट पुढे पाठवली, असा आरोप दिल्ली पोलिसांनी तिच्यावर केलेला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलीस दिशासह निकीता जेकब आणि शंतनू मुळूक यांचीही चौकशी करत आहेत.

Exit mobile version