Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिव्यांग रुग्णाचे उपचारसह मेडिकलचे संपूर्ण बिल केले माफ

भडगाव संजय पवार । कोरोनाच्या उपचारांमध्ये अनेक ठिकाणी लूट होत असल्याची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधून कळत असतांना येथील समर्पण हॉस्पीटलचे संचालक डॉ. निलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील यांनी दिव्यांग रूग्णाचे उपचारासह औषधीचे बील माफ करू समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

याबाबत वृत्त असे की, भडगाव येथे जुना तरवाडे रस्ता लगत लाईफ लाईन कोविड केअर सेंटर सुरू आहे. येथे पाचोरा तालुक्यातील हरेश्‍वर पिंपळगाव येथील ६७ वर्षाचे मूक व कर्णबधिर रुग्ण दि. ४ रोजी उपचारासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांचा स्कोर ११-१२ होता. पाचोरा येथे तपासणी नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कुटुंब घाबरले होते. त्यांना धीर देत भडगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र येथील उपचार पद्धतीने ते अल्पावधीत बरे झाले.

पूर्णतः मूक व कर्णबधिर असल्याने त्यांची उपचारासाठी दाखल झाले तेव्हा पासून कोविड केअर कडून विशेष काळीज घेण्यात येत होती. दिनांक ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ते पुर्ण बरे झाल्याने त्यांना डीसचार्ज देण्यात आला. यावेळी लाईफ लाईन कोविड केअर कडून त्यांचा सपत्नीक, दोन्ही मुलांसह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे मेडिकल व दवाखान्याचा संपूर्ण खर्च कोविड केअर कडून मोफत करण्यात आला.

यावेळी डॉ निलेश पाटील, डॉ पल्लवी पाटील, डॉ गोविंदसिंग पवार यांनी रुग्णाचा सत्कार केला. यावेळी कोविड केअर चे कर्मचारी शुभम पाटील, बाळू मांडोळे, संदीप पाटील, राजू मोरे, ज्ञानेश्‍वर महाजन, प्रवीण पाटील, दिनेश महाजन, यांच्यासह पत्रकार नरेंद्र पाटील, रवींद्र पाटील, प्रा. अतुल देशमुख आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही डॉ निलेश पाटील व डॉ पल्लवी पाटील यांनी शासकीय कोविड केअर ला जाऊन उपचारासाठी दाखल रुग्णांना मोफत योगासने शिकवले, तर त्यांनतर योगा व निसर्गोपचार पध्दतीने होणारे फायद्यांचा मोफत प्रचार करून अनेक नागरिकांना मदत केली . सद्या ही येथील लाईफ लाईन कोविड केअर च्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे.

या संदर्भात रूग्णाने येथे उपचार घेऊन लवकर बरा झालो, आनंद वाटत असल्याचे सांगत रुग्णांनी हात जोडत तुम्हीच आमचे देव आहेत असे खुणावले. हेच आभार वाक्य पत्नी व मुलांच्या तोंडून आले समजावून सांगण्यात आले. यावेळी कुटुंब भावुक झाले होते. आम्ही घाबरलो होतो मात्र आता वडील बरे होऊन घरी जाताना आनंद गगनात न माव्हणारा आहे असे मुलाने सांगितले.

तर डॉ. निलेश पाटील म्हणाले की, आपल्या हातून रुग्णांची सेवा होवो हाच माझा प्रामाणिक हेतू आहे. अपंग व्यक्ती कडुन बिल न घेता सेवा करणे हीच खरी सेवा आहे. रुग्ण मूक व कर्णबधिर असल्याने त्यांच्याकडून मेडिकल बिलासह कोविड केअरची कोणतीही फी घेतली नाही. सुधाकर पाटील हे बरे होऊन घरी जात असल्याने मनस्वी आनंद आहे. त्याच्या चेहर्‍यावरील आनंद मला प्रेरणा देते.

Exit mobile version