Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिव्यांग बोर्डासाठी कुपन प्रणालीला उत्तम प्रतिसाद

जळगाव, प्रतिनिधी  । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. दिव्यांग बांधवांची दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीच्या पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला.

 

दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याच्या कामकाजात २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. तसेच पुढील दोन बुधवार दि. ११ व १८ ऑगस्टचे बुकिंग कुपनदेखील आरक्षित झाले असून गुरुवारी ५ ऑगस्टपासून बुधवार दि. २५ ऑगस्टचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २८ जुलै २०२१ पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. ज्या  दिव्यांग बांधवानी ४ ऑगस्टचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २  कडील  अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली.  उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह डॉ. नेहा भंगाळे, डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्न पाटील, डॉ. गिरीश राणे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाळ सोळंकी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, आरती दुसाने, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की,दिव्यांग बोर्डात तपासणीसाठी येणाऱ्या बांधवांची होणारी दरवेळी होणारी गैरसोय पाहता बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली. त्यानुसार पहिल्याच दिवशी आगाऊ कुपन घेऊन दिव्यांगांनी तपासणी केली. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर झाली. कुपन प्रणालीमुळे कार्यवाही करण्यासाठी देखील सोपे जात आहे. बोर्डातील कामकाजाविषयी कोणाला सूचना करायच्या असतील तर त्या स्वागतार्ह आहे.त्यावर विचार केला जाईल.

 

Exit mobile version