Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपककुमार गुप्ता राज्यपालांना भेटले; क्षेत्रसभेच्या पालनाबाबत केली चर्चा ! (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी आज भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महापालिका क्षेत्रात क्षेत्रसभांच्या नियमांचे उल्लंघन होत असून याचे पालन करण्यात यावे या मागणीसाठी चर्चा केली.

महापालिकेच्या हद्दीत प्रत्येक प्रभागात संबंधीत नगरसेवकाच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे क्षेत्रसभा घेण्यात यावी असे महापालिका अधिनियम यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र याचे पालन होतांना दिसत नाही. यामुळे जळगाव महापालिकेतील प्रत्येक प्रभागात क्षेत्रसभा घेण्यात यावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यामुळे मध्यंतरी क्षेत्रसभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. या पार्श्‍वभूमिवर, गुप्ता यांनी याबाबतची तक्रार करण्यासाठी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. राज्यपाल भवनाने त्यांना यासाठी आज सकाळची वेळ दिली होती. या वेळेत गुप्ता यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना क्षेत्रसभा नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.

या संदर्भात माहिती देतांना श्री गुप्ता म्हणाले की, महापालिका अधिनियमानुसार प्रत्येक प्रभागात क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. ही क्षेत्रसभा गावातील ग्रामसभेच्या धर्तीवर असावी अर्थात, यात त्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे. या सभेच्या अध्यक्षस्थानी त्या प्रभागाचा नगरसेवक तर सचिव म्हणून महापालिकेतील अधिक्षक वा समकक्ष पदावरील कोणताही अधिकारी असावा. या सभा नियमितपणे घेण्यात याव्यात. दोन सभांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा गॅप नसावा. सतत दोन वर्षापर्यंत क्षेत्रसभा न घेतल्यास संबंधीत नगरसेवकाला अपात्र करण्याची तरतूद देखील या अधिनियमात करण्यात आलेली आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. एका अर्थाने हा अधिनियमाचा अवमान असून राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी गुप्ता यांनी याप्रसंगी त्यांच्याकडे केली.

यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे काम राज्य शासनाने असले तरी आपण याबाबत माहिती घेऊ, तोवर आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना माझा संदर्भ देत याबाबत चर्चा करावी असे भगतसिंह कोश्यारी यांनी दीपककुमार गुप्ता यांना सुचविले. यानुसार ते पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

 

Exit mobile version