Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहा वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनातले काही सांगितले नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था । “मागच्या सात, आठ, दहा वर्षापासून एनडीए फक्त नावाला आहे. एनडीएमध्ये काही नाही. एनडीएमध्ये कुठली चर्चा होत नाही, काही प्लानिंग नाही किंवा कुठली बैठक होत नाही. मागच्या दहा वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनात काय आहे? यावर चर्चा करण्यासाठी लंचला एनडीएची बैठक बोलावल्याचे मला आठवत नाही” अशी खंत सुखबीर सिंग बादल यांनी बोलून दाखवली.

कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता. “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे” अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“आघाडी फक्त कागदावर असू नये. यापूर्वी वाजपेयी यांच्या काळात एनडीएमध्ये योग्य पद्धतीने संबंध जपले जायचे. माझे वडिल एनडीएचे संस्थापक सदस्य आहेत. आम्ही एनडीए बनवली पण आज एनडीए नाहीय हे खूप दु:खद आहे” असे सुखबीर सिंग बादल म्हणाले.

“राज्यामध्ये आम्ही नेहमीच भाजपाला सोबत घेतले आहे. माझे वडिल प्रकाश सिंग बादल यांनी ज्या पद्धतीने आघाडी चालवली, तसा कारभार असला पाहिजे. प्रत्येक निर्णयासाठी ते भाजपाला बोलवायचे. आम्ही जेव्हा, कधी राज्यपालांना भेटायला गेलो, भाजपा आमच्यासोबत असायची. राज्य पातळीवर आम्ही मोठे होतो, तरीही आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना विश्वासात घ्यायचो” असे सुखबीर सिंग बादल म्हणाले

Exit mobile version