Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखण्यात पाकिस्तान अपयशी

पॅरिस/इस्लामाबाद: वृत्तसंस्था । ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी धडपडणाऱ्या पाकिस्तानला पॅरिसमध्ये झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये करड्या यादीतच ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दहशतवाद्यांची आर्थिक मदत पूर्णपणे रोखण्यात पाकिस्तानी सरकार अपयशी ठरले आहे,

फेब्रुवारी २०२१पर्यंत पाकिस्तानला करड्या यादीतच राहावे लागणार आहे, असे ‘एफएटीएफ’चे अध्यक्ष मार्कस प्लीयर यांनी सांगितले. भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील दोन दहशतवादी मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत यादीतील चार हजारांहून अधिक दहशतवादी अचानक गायब होणे याचीही नोंद घेण्यात आली आहे.

एफएटीएफने दिलेल्या सहा प्रमुख जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे. काळ्या यादीत समावेश न होता करड्या यादीत स्थान राहणे हीच बाब पाकिस्तानसाठी दिलासादायक ठरली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळवण्यास पाकिस्तानला अडचणी येणार आहेत. यामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांत ‘एफएटीएफ’चे पूर्ण डिजिटल सत्र झाले. मनीलाँडरिंग आणि दहशतवाद्यांची आर्थिक मदत रोखण्याविरुद्धच्या लढाईतील जागतिक बांधिलकी आणि मानके पूर्ण करण्याबाबत कार्यवाहीचे परीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एफएटीएफ’चे अध्यक्ष मार्कस प्लीयर यांनी सांगितले, ‘पाकिस्तान करड्या यादीतच राहणार आहे.’ दहशतवाद्यांची आर्थिक मदत पूर्णपणे रोखण्यासह २७ जबाबदाऱ्या पाकिस्तानला दिल्या होत्या. २१ जबाबदाऱ्या पाकिस्तानने पूर्ण केल्या आहेत.उर्वरित सहा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीतच राहावे लागणार आहे, प्लीयर पुढे म्हणाले की, पाकिस्तानला दहशवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांवर निर्बंध आणले पाहिजेत, त्यांच्यावर खटलेही चालवले पाहिजेत. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत रोखली पाहिजे.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेचा ऑपरेशनल कमांडर जाकीऊर रहमान लखवी यांसारख्या संयुक्त राष्ट्रांकडून निर्बंध आणलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या यादीमधून पाकिस्तानमधील ७,६०० दहशतवाद्यांपैकी चार हजार दहशतवादी मुख्य यादीतून गायब झाले आहेत.पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये एफएटीएफची बैठक होणार आहे. यात पाकिस्तानच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.

Exit mobile version