Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहशतवादी हल्ल्यातून अफगाणी उपराष्ट्रपती बचावले

काबूल वृत्तसंस्था ।तालिबान आणि पाकिस्तानच्या धोरणाचे कट्टर विरोधक समजले जाणारे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या ताफ्यावर काबूलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या बॉम्ब हल्ल्यात उपराष्ट्रपती सालेह थोडक्यात बचावले. मात्र, तीन जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहे.

उपराष्ट्रपती सालेह यांच्या मुलाने ट्विट करून म्हटले की, माझे वडील आणि मी सुरक्षित आहोत. आमच्यासोबतची एकही व्यक्ती या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली नाही. सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षीदेखील सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी २० जण ठार झाले होते.

सालेह यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला इतका भीषण होता की, वाहनांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटामुळे काही इमारतींचेही नुकसान झाले आहे. आजच्या दिवशी १९ वर्षांपूर्वी तालिबानविरोधी नेता अहमद शाह मसूद यांचीदेखील हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यामागे तालिबान आणि पाकिस्तानमधील काही दहशतवादी गटांचा हात असल्याची चर्चा आहे.

अफगाणिस्तान सुरक्षा दलाने या परिसराला घेरले असून शोध मोहीम सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटामुळे परिसरात आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जवाबदारी घेतली नाही.

Exit mobile version