Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

थकीत पीक विम्याच्या रक्कमेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०२० ची नुकसान भरपाई दोन वर्षांपासून प्रलंबित असून ही रक्कम खात्यावर जमा व्हावी यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या कार्यालयातील दालनात भाजप पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा समवेत ठिय्या आंदोलन केले.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०२० ची नुकसान भरपाई आजपावेतो प्रलंबित असून त्यामध्ये कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, तूर, मका, बाजरी यासाठी पाचोरा तालुक्यातील १ हजार ७८६ शेतकऱ्यांकरिता ४४ लाख ७१ हजार २५९ रुपये आणि भडगाव तालुक्यातील २३ शेतकऱ्यांकरिता ०१ लाख ४३ हजार १७९ रुपये मंजूर असून सुद्धा गेल्या २ वर्षांपासून हे शेतकरी प्रलंबित रक्कम खात्यावर जमा होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यासाठी खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनीशुक्रवार, दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या कार्यालयातील दालनात शेतकऱ्यांचा समवेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी खा.उन्मेष पाटील यांनी बोलतांना सांगितले की, “वारंवार निवेदने देऊन देखील शासनस्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही. पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील याबाबत वारंवार चर्चा केली असता ते देखील या विषयात गंभीर नाहीत. परंतु यामध्ये शेतकरी पूर्णपणे भरडला जात असून, शेतकऱ्यांच्या समस्यांची या असंवेदनशील सरकारला कुठलीही घेणे देणे नाही. असे खा. उन्मेष पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, तूर, मका, बाजरी यांचे पाचोरा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे सन – २०२० च्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थकीत असून एका बाजूला हे सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची व ट्रान्सफॉर्मर ची वीज तोडणी करत आहे. शेतकर्‍यांकडे वीज देयके भरण्यासाठी तगादा लावत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम २ वर्षे थकीत ठेवून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. त्यामुळे दि. २६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा न झाल्यास कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे शेतकऱ्यांसह सायं ०५:३० वा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्या दालनात आंदोलन सुरु केले. जोपर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम खात्यावर जमा होत नाही अथवा कृषी विभागाकडून लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत सदर ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी दिला.

याप्रसंगी कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी खा. उन्मेष पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली तरी देखील आपल्या निर्णयावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवल्याने रात्री उशिरा ११:०० च्या सुमारास कृषी अधीक्षकांनी ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा होईल.असे लेखी स्वरूपाचे पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.असे खा.उन्मेष पाटील, आ.सुरेश भोळे यांच्यासह अमोल शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कठोर भूमिका घेऊन आंदोलन करणाऱ्या खा. उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह अमोल शिंदे यांचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कौतुक केले व आभार मानले.

Exit mobile version