Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

थकबाकी वसूल करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा –  सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे इशारा

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ग्राहकांकडून वीज देयकांची थकबाकी वेळेत वसूल करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा. यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिला.

जळगाव मंडळातील अभियंता व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूख शेख उपस्थित होते.

ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर रीडिंग एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सींना मीटर रिडींग घेताना फोटोंचा दर्जा सुधारणे तसेच अचूक कामकाज करण्यास सांगितले आहे. याकडे उपविभागीय अभियंते व कार्यकारी अभियंते यांनीसुद्धा लक्ष द्यावे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक तसेच पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके वेळेत भरण्यासाठी अभियंत्यांनी पाठपुरावा करावा.

वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्याचे निर्देशही डांगे यांनी दिले. या बैठकीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जळगाव मंडळातील सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

Exit mobile version