Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ बँकेतून ३ कोटी ९२ लाखांचा ऐवज लुटला; फरार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील एसबीआय बँकेत अज्ञात दोन दरोडेखोरांनी बँक मॅनेजरला जखमी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लूटून नेल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली होती. यात पोलीसांच्या चोकशीनंतर सुमारे ३ कोटी ७५ लाख रूपयांचे सोने आणि १७ लाखांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कालिंका माता मंदीर ते काशीबाई उखाजी शाळ भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. नेहमीप्रमाणे गुरूवारी १ जुन रोजी सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आली होती. त्यावेळी कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून दिले. त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जावून लॉकरच्या चाव्या मागितल्या. याला प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत केली. त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ७५ लाख रूपयांचे व १७ लाख रूपयांची रोकड असा एकुण ३ कोटी ९२ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. विशेष म्हणजे आलेल्या दोन्ही दरोडेखोर येतांना पायी डोक्यात हेल्मेट घालून आले होते. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून पसार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गावळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह श्‍वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, जखमी झालेल्या बँक मॅनेजरला शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version