Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण करू देणार नाही – डॉ. अश्विन सोनवणे

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा परिसरातील वार्ड क्रमांक ९ मध्ये १० कोटी पेक्षा जास्त रकमेचा शासकीय निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील काँक्रिटीकरणाचे स्वप्न पूर्ण होणार असून चकचकीत रस्ते येत्या काही दिवसातच पहावयास मिळतील असे प्रतिपादन डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी श्रीराम समर्थ मित्र मंडळाच्या एका कार्यक्रमात केले.

 

याप्रसंगी बोलताना त्यांनी खुल्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींचा खरपूस समाचार घेतला. मध्यंतरी श्रीराम समर्थ कॉलनीतील खुल्या भूखंडावर काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. या अनुषंगाने बोलताना त्यांनी सांगितले की यानंतर जर असा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्याशी संपर्क साधावा. यानंतर अशी कोणतीही घटना सहन करून घेतली जाणार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी घेतल्याने या सभेत टाळ्यांचा गजर झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे आपल्या देशाची वाटचाल विकासाकडे होत असल्याने इतर देशांच्या तुलनेत आपल्या समस्या अत्यंत कमी झालेल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोना व अमृत योजनेमुळे रखडलेली सर्व कामे येत्या काही दिवसात पूर्ण केली जातील असे आश्वासन देखील त्यांनी या कार्यक्रमात दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा पांढरे यांनी केले तर प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी सादर केले.

 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक मयूर कापसे यांनी वार्डात सुरू असलेल्या सर्व विकासकामांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक गल्लीत रस्ता, गटार व उद्याने तयार करण्याबाबत प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.  काही दिवसांपूर्वीच पिंपराळा चौकात भूमिपूजन झाले होते त्यानंतर आज श्रीराम समर्थ कॉलनी पांडुरंग नगर व जिल्हा बँक कॉलनी भूमिपूजन केल्याने त्यांना विशेष आनंद झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून श्रीराम समर्थ कॉलनीच्या फलकाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन मेढे, किशोर पाटील, तुषार चौधरी, निलेश भट, भूपेंद्र मराठे, स्वप्निल पाटील, देवेंद्र चौधरी, रामकृष्ण पाटील, पि के पाटील, राहुल चौधरी, मंगल पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, यांनी विशेष सहकार्य केले.

Exit mobile version