Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – जयंत पाटील

मुंबई- शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले.

 

राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल. यामध्ये विधानसभाध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.

 

शिंदेसरकार वाचले हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो. कसे – बसे शिंदेसरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

 

राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

 

तत्कालीन राज्यपालांना जसा माणूस भेटेल तसे ते मार्गदर्शन करत होते. राज्यपाल स्तरावरील व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नसले तरीही त्यांची चोवीस तास अशीच भूमिका होती. त्यांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचे सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

 

राज्यातील सरकार हे बेकायदेशीर आहे हे सिद्ध झाल्याने राज्यात सत्ता कोणाची हे जनतेला महत्वाचे नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे होती त्याला अधिकची शक्ती मिळेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते असा मिश्किल टोला लगावतानाच ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत त्यामुळे त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version