Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तोतया पोलीस बनून वयोवृद्धाची लुट करणाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे येथील एका ६८ वर्षीय वृद्धास गेल्या १३ जानेवारीला सकाळी दोन अज्ञात भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व इतर ऐवज लांबवून पोबारा केला होता. याप्रकरणी शिरपूर येथून दोघ तोतया पोलिसांना यावल पोलिसांनी मंगळवारी ( ता.२२) अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडी राखुन ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेले अधिक वृत्त असे, की, पाडळसे (ता.यावल) येथील दिलीप पुरुषोत्तम बऱ्हाटे (वय ६८) हे वयोवृद्ध १३ जानेवारीला सकाळी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच ०३ एपी १६०८ )वरून भुसावळ मार्गे यावल येथे येत होते. यावेळी शहरापासून दोन किलोमिटर लांब असलेल्या घोडे पिर बाबा दर्गा जवळ सकाळी दहाच्या सुमारास बऱ्हाटे यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपण जळगावातील पोलिस असल्याचे सांगत तुमच्याकडे गांजा असल्याचा आम्हाला संशय आहे असे त्यांना सांगितले व त्यांची दुचाकी वरच अंगझडती घेतली. दरम्यान त्यांच्या हातातील सोन्याची चाळीस हजार रुपये किमतीची अंगठी व इतर ऐवज संशयितांनी जबरदस्तीने काढून घेतले व भुसावळच्या दिशेने त्यांनी पळ काढला. याप्रकरणी बऱ्हाटे यांच्या फिर्यादीनुसार येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, नेताजी वंजारी, संदीप सूर्यवंशी, अशोक बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, या दोघ संशयितांची ओळख परेड करण्यात येणार असल्याने पोलिस कोठडी राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. संशयितांना येथील पोलिस ताब्यात घेणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी शिरपूर न्यायालयाबाहेर केलेला हायहोल्टेज ड्रामा शिरपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. संशयितांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनीही सिनेस्टाईल आक्रोश करीत पोलिसांना विरोध केला. जावेद अली नौशाद अली ( वय ४३) व जफर उसेन उर्फ इज्जत हुसेन (वय३९ , दोघे रा. शिवाजीनगर, रेल्वे पोलीस कॉलनी, परळी, जिल्हा बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

Exit mobile version