Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तृणमूलचे नेते सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार भाजपाच्या वाटेवर

 

कोलकाता : वृत्तसंस्था । तृणमूलचे नेते सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार भाजपाच्या वाटेवर आहे, असा दावा भाजपाच्या खासदारानं केला आहे. या दाव्यामुळे बंगालमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचे पडघम आतापासून वाजायला लागले आहेत. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी भाजपानं जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. आता तृणमूल काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहेत. भाजपानं बंगाल विशेष लक्ष दिलं आहे. तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचं दिसत असून, भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूलचे पाच खासदार राजीनामा देणार असल्याचा दावा केला आहे.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील जगद्दल घाटावर छटपूजेनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमात खासदार अर्जून सिंह हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सौगत रॉय हे तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

सिंह म्हणाले,”मी पुन्हा पुन्हा सांगतोय की, तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार कोणत्याही क्षणी पक्षाचा राजीनामा देतील. त्यानंतर हे पाच खासदार भाजपात प्रवेश करणार आहेत,” असा दावा त्यांनी केला. सौगत रॉय यांचंही नाव या यादीत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सिंह म्हणाले,”सौगत रॉय हे तृणमूलचे आणि ममता बॅनर्जी यांच्यातील मध्यस्थ म्हणून स्वतः कॅमेऱ्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सुवेंधू अधिकारी यांच्याही चर्चा केली आहे. पण, एकदा कॅमेरा बाजूला सरकारल्यानंतर तुम्ही सौगत रॉय यांचंही नावही समाविष्ट करू शकता,” असं अर्जून सिंह यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version