Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुमच्याकडे पेन ड्राईव्ह बाळंत होतात का ? : राऊतांचा खोचक सवाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पेन ड्राईव्ह बाळंत होतात का असा खोचक प्रश्‍न विचारत तुम्ही १०० पेनड्राईव्ह काढलेत तरी आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडले असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीस हे एकामागून एक पेन ड्राईव्ह सादर करत असल्यावर आज खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.कालच फडणवीसांनी विधानसभेत एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख केला असून त्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

याबाबत आज राऊत म्हणाले की,, केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी सुरू आहे. मिलिभगत सुरू आहे. त्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातलं सरकार त्यांना चालू द्यायचं नाहीये. त्यांना हे सरकार खोट्या प्रकरणातून उद्ध्वस्त करायचंय. याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं चाललंय. एकदा त्यांनी ज्यांना ज्यांना तुरुंगात पाठवायचंय, त्यांची एक यादी तयार करा. ती केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन सांगा की या २५ लोकांना तुरुंगात टाकायचंय. आम्हाला आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप करा, काही हरकत नाही. तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा असे ते म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात इतकं नीच आणि हलकट पातळीवरचं राजकारण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन , असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला. नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक खोटं भंपक प्रकरण तयार करतात. कसंकाय त्यांना हे बाळंतपण जमतं माहीत नाही. कुठून सुईणी आणतात हे खोट्या प्रकरणांची बाळंतपणं करण्यासाठी? वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गोष्ट आहे की आमच्याकडे रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतोय. रोज काढतायत, मग ते ओरडतायत. पेनड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. जे करायचंय ते करा.. तुमच्या १०० पेनड्राईव्हवर आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडेल, असं राऊत म्हणाले.

Exit mobile version