Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुकारामवाडीतील दोन गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्ह्यातील तुकारामवाडी येथील दोन गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे.

भूषण उर्फ भासा विजय माळी व सचिन उर्फ टीचकुल कैलास चौधरी (दोन्ही रा.तुकारामवाडी) असे दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात जामीन झाल्यावर कारागृहातून बाहेर पडताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी हे आदेश काढले.

त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी लागलीच दोघांना शहराच्या हद्दीबाहेर रवाना केले. भूषण माळी हा टोळी प्रमुख असून सचिन हा त्याचा साथीदार आहे. या दोघांच्या टोळीने शहरात खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. भूषण याच्यावर खुनाचे २ दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्रे बाळगणे यासारखे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत तर सचिन याच्याविरुध्द खुनाचा १ प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे ७ गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यात दोघं जण कारागृहात होते. दोन दिवसापूर्वी सचिन याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दोघांना कारागृहातून सुटका झाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी बुधवारी ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे स्वत:च्या अधिकारात भूषण व सचिन या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील व साईनाथ मुंढे यांनी दोघांना बुधवारी हद्दपारीची नोटीस बजावून शहराबाहेर रवाना केले.

Exit mobile version