तीर्थक्षेत्र विकासकामाची आ. चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधीस्थळ जुनी कोथळी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून सुचना दिल्या.

महाशिवरात्री आदिशक्ती मुक्ताई यात्रोत्सव पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई समाधी स्थळ जुनी कोथळी मंदिराचे बांधकाम तीर्थक्षेत्र पर्यटन विकास निधी अंतर्गत सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून निधी अभावी हे काम रखडलेले होते परंतु नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी २.५ कोटी रुपये निधी कामासाठी उपलब्ध केला आहे. तर, रखडलेल्या कामापैकी महिन्यात आदिशक्ती मुक्ताईंचा खूप मोठा यात्रा उत्सव आहे. या यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून भाविक व वारकरी मोठ्या संख्येने येत असतात त्यांना येथे येत असलेल्या अडचणी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

याच्या अंतर्गत संबंधीत ठेकेदाराला आदिशक्ती मुक्ताई मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच गाभार्‍यात अत्यावश्यक असलेले सुशोभीकरणाचे काम करणे, साचणारे पाणी संदर्भात प्लन्बिंग ची कामे अशी सदरील कामे तातडीने करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिल्या. तसेच उर्वरित कामासाठी वाढीव निधीची अंदाजपत्रकानुसार तरतूद करण्याची मागणी शासनाकडे केलेली असून सदरील निधी देखील लवकरात लवकर उपलब्ध करून आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या मंदिर बांधकाम गती देण्यात येईल अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रवीण बेंडकुले, सहायक अभियंता डी. एम. पाटील, सच्चीदानंद शेजोळे, मंदीर बांधकाम कंत्राटदार लोणारी तसेच शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र कोळी, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उद्धव महाराज , ज्ञानेश्वर हरणे, गणेश पाटील , उमेश पाटील, युवराज कोळी, नितीन चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Protected Content