Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मगरमिठी आता सैल होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासा देणारी आहे. १११ दिवसांनंतर म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. 

 

दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे. देशातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात ३४ हजार ७०३ नवीन रुग्ण आढळून आले असून, ही मागील १११ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निचांकी रुग्णसंख्येबरोबरच देशातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्याही घटली आहे. देशात ४ लाख ६४ हजार ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

 

डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत भारतात ३५,७१,०५,४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्‍या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत.

 

 

महाराष्ट्रातील दररोजच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या बाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रूग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात सोमवारी ६ हजार ७४० नवीन बाधित आढळले, तर १३ हजार २७ रूग्ण बरे झाले. राज्यात ५१ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५८,६१,७२० बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के  आहे.

 

Exit mobile version