Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर पालक सोबत रुग्णालयात राहणार की नाहीत ?

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकारचे वैज्ञानिकच कोरोनाची तिसरी लाट येईल असं म्हणत आहेत तर सरकारने यासंदर्भात काय तयारी केली आहे?, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग झाला तर पालकांनी काय करावं, त्यांच्यासोबत रुग्णालयात थांबावे की नाही ?  असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाचे न्या. डी. वाय  चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आज सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली.तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकारने काय तयारी केली आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर्स आणि परिचारिकांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्राने त्यासंदर्भातही नियोजन करावं असं म्हटलं आहे. येणारी तिसरी लाट पाहून धोरणे आखावीत असा सल्ला न्यायालयाने केंद्राला दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणीदरम्यान तिसऱ्या लाटेसंदर्भात चिंता व्यक्त केली.

 

न्या. चंद्रचूड यांनी, आता आपण दुसऱ्या लाटेत आहोत. तिसरी लाटही येणार आहे. तेव्हाची आव्हाने वेगळी असतील. त्यासाठी आपण सध्या काय करत आहोत?, असे प्रश्न केंद्राला विचारले. खंडपीठातील दुसरे न्यायाधीश न्या. एम. आर. शाह यांनी इथे तर आपण फक्त दिल्लीबद्दल बोलत आहोत. मात्र भारतातील बहुतांश लोकखेड्यांमध्ये राहतात. दूर्गम भागातील परिसरासंदर्भात काय नियोजन आहे. भविष्यातील तयारी कशी सुरु आहे. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसं काम करणार आहात? तुम्ही इथे ऑक्सिजन घेऊन जायला कंटेनर नसल्याचं सांगताय तर भविष्यात कसं काम करणार? असा सडेतोड प्रश्न विचारला

 

न्या. चंद्रचूड यांनी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा संदर्भ देत, यामध्ये तर लहान मुलांना संसर्ग झाला तर त्यांचे आई-वडील काय  करणार?, हे पालक त्यांच्या मुलांसोबत रुग्णालयांमध्ये थांबणार की काय करणार?, सरकारने काय नियोजन केलं आहे? लहान मुलांच्या लसीकरणाचा काय विचार केला आहे?, असे प्रश्न केंद्राला विचारले. यावर उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च स्तरीय बैठकांमध्ये निर्णय घेतले  जात असल्याचं सांगत काही निर्णयांवर पुन्हा विचार केला जात असल्याचं न्यायालयाला सांगितलं. आम्ही ऑक्सिजनचे टँकर्स पुरवत आहोत. केंद्र सरकार एखाद्या रुग्णालयाप्रमाणे काम करणाऱ्या ट्रेन्सही तयार करत आहेत. या ट्रेन दुर्गम भागात जाऊन रुग्णांना सेवा देतील. याबद्दल विचार सुरु आहे, असं मेहता यांनी सांगितलं.

 

आपण तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येणाऱ्या डॉक्टरांची टीम तयार करू शकतो का? दुसरी लाट हाताळण्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ नाही. तिसर्‍या लाटेसाठीही मनुष्यबळ नाही. आपण त्यात फ्रेश ग्रॅज्युएट डॉक्टर आणि नर्स वापरु शकतो का? तिसर्‍या लाटेत डॉक्टर आणि परिचारिका थकलेल्या असतील. तेव्हा काय करणार? काही बॅकअप तयार करावा लागेल, असंही न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version