Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी तयारी आहे – मुख्यमंत्री

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । पहिली लाट ज्येष्ठ नागरिकांमध्ये आली, दुसरी युवा आणि मध्यमवयीन नागरिकांमध्ये आली. आता मुलांच्या गटात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण शांत बसणं शक्य नाही. लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.

 

तिसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील कोरोना कसा रोखणार? या विषयावर आज लहान मुलासांठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सशी त्यांनी संवाद साधला.  राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एका गोष्टीचं मला समाधान आहे. मागील वर्षी साधरण याच दिवसांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली होती. तेव्हा कदाचित आपल्या देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आपण लवकर पावलं उचलायला सुरूवात केली. रूग्णालयं कमी पडतील. बेड्स कमी पडतील हा विचार करून आपण जम्बो सुविधा केंद्र तयार केली. तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. सर्वाधिक तयारी महाराष्ट्रात झाली.”

 

 

“राज्यात कोरोनाचा कहर उच्चांक गाठत असताना देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी लॉकडाउनचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आणि त्यासाठी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की,कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं.  अजुन यश जरी मिळालेलं नसलं, तरी या नियंत्रणाचं सर्व श्रेय हे डॉक्टरांना आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

 

“नागरिकांनी घाबरू नये, घाबरण्याचं कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी. कारण अजुनही धोका टळलेला नाही. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे.  सध्याच्या लाटेत ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांत मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे. महाविकासआघाडी सरकारची सहा कोटी नागरिकांसाठी दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी आहे. मात्र दुर्दैवाने अजुनही लस पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण प्रक्रिया स्थगित करावी लागली आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

 

Exit mobile version